गोशाळा-
गाय हे शेतकऱ्याला उत्पन्नाचे साधन होऊ शकते. आज मितीस गोवंशाच्या आधारे शेतकरी आपली शेती सुपीक बनवू शकतो. हे अनेक शेतकरी बंधूंनी सिद्ध करून दाखवले आहे. जसा शेतीला याचा उपयोग होतो, तसाच व गो- आधारित अन्य उत्पादनेही तयार करून तो विकू शकतो. जसे की दूध, तूप, दही, ताक, लोणी, श्रीखंड, दशपर्णी अर्क, गोमूत्र, गोमूत्र अर्क एवढेच नव्हे तर निव्वळ गाईचे शेणही विकले जात आहे. रोजच्या घरातील पूजेकरता लागणारी धूपबत्ती ही बनवून विकली जाते. हे सर्व आपल्या प्रकल्पात आज आपण प्रत्यक्षात कृतीत आणत आहोत, तसा प्रसारही करत आहोत. शहरांमधून या सर्व उत्पादनांना चांगली मागणी आहे, चला तर मग आपण आज पासून गोवंश रक्षणाकरता गोरक्षक बनूया. जय गोपाल!!!!!
फुलशेती-
कोकणातील शेतीवर बदलत्या हवामानाचा वेळोवेळी परिणाम होत असतो. त्यामुळे शेतकऱ्याला दरवर्षी भात शेतीतून किंवा बागायती शेतीतून उत्पादन मिळेलच याची खात्री देता येत नाही. कधी-कधी नैसर्गिक हवामान,जंगली जनावरे, वेगवेगळ्या किडींचा प्रादुर्भाव यामुळे शेतकऱ्याला नुकसानीला सामोरे जावे लागते, आणि म्हणूनच या शेतीसोबत जोडशेती करता येईल का? असा प्रयोग प्रकल्पाच्या माध्यमातून समोर आणला गेला. फुलशेती हा त्याला योग्य पर्याय असल्याचे सिद्ध करण्यात आले. आज प्रकल्पाच्या माध्यमातून लिली या फुलाची लागवड करून शेतकऱ्याला काही स्वरूपामध्ये अर्थार्जन होईल याची शास्वती दिली जाते. आज प्रकल्पामध्ये काही गुंठ्यामध्ये फुल शेती म्हणून लिलीची लागवड केलेली आहे. सदर लिली आजूबाजूच्या मोठ्या गावांमध्ये विक्रीसाठी पाठवली जाते.या शेतीमुळे हातखर्चाला शेतकऱ्याला चार पैसे वेळेत मिओलातात. माणगाव आणि परिसरातील काही शेतकऱ्यांनी फुल शेतीचा प्रयोग यशस्वीपणे केलेला आहे.
गांडूळखत-
डॉक्टर हेडगेवार स्मृती सेवा प्रकल्प अंतर्गत माणगाव आणि आजूबाजूच्या गावातील शेतकऱ्यांना रासायनिक खतांचा दुरुपयोग टाळून सेंद्रिय खतांचा वापर करून शेती करण्यास प्रवृत्त केले जाते. यासाठीचे प्रायोगिक तत्त्वावर चालणारे उपक्रम प्रकल्पामध्ये राबवले जातात आणि यशस्वीता समजल्यानंतर शेतकऱ्यांना गांडूळ खतावर आधारित शेती करता येते, हे दाखवून दिले जाते. आज हेडगेवार प्रकल्पामध्ये स्वतःचे गांडूळ खत निर्मिती केंद्र असून या ठिकाणी सेंद्रिय गांडूळ खत तयार केले जाते. याची बाजारामध्ये विक्रीही केली जाते. मळगाव येथील शेतकरी गटाने गांडूळ खत प्रकल्प राबवला असून येथील शेतकरी आपल्या शेतामध्ये गांडूळ खताचा मोठ्या प्रमाणावर वापर करतात आणि आजूबाजूच्या शेतकऱ्यांना गांडूळ खत विकत देतात. यातून शेतकऱ्यांना अर्थार्जनही होते. गांडूळ खत कसे बनवावे? याविषयीचे प्रशिक्षण डॉक्टर हेडगेवार प्रकल्पाच्या माध्यमातून शेतकऱ्यांना वेळोवेळी दिले जाते.
बेबी कॉर्न–
उत्तम प्रतीच्या दुधासाठी बेबीकॉर्नची लागवड करून त्यातून उत्तम उत्पन्न व हिरवा चारा गाई म्हशींसाठी देणे. यातून अनेक शेतकऱ्यांना आर्थिक लाभ झाला आहे. गट शेतीच्या माध्यमातून गेली अनेक वर्षे बेबीकॉर्नची लागवड शेतकरी करत आहेत. गोठोस व मळगाव येथे दूध संकलन केंद्र स्थापन करून शेतकरी स्वतः आर्थिक लाभ घेत आहेत. शेतकरी गटांमध्ये गो आधारित शेती, ग्रामीण बी बियाणे संकलन व संवर्धन, सेंद्रिय पद्धतीची शेती करून उत्पादन खर्च कमी करून उत्पादकतेत वाढ संस्थेचे ध्येय आहे.
मुरघास-
कोकणामध्ये मोठ्या प्रमाणावर गोधन/ दुधाळ जनावरे आहेत. घाटमाथ्याचा विचार करता सरासरी उत्पादनांमध्ये कोकण खूप मागे आहे. याचे मुख्य कारण म्हणजे सकस पशुखाद्याची कमतरता. कायमस्वरूपी हिरव्या चाऱ्याची उपलब्धता नसते, तसेच पशुखाद्याची किंमती सुद्धा मोठ्या प्रमाणावर आहेत. त्यामुळे योग्य तेवढ्या प्रमाणावर जनावरांना खाद्य घातले जात नाही. परिणामी दूध व जनावरांच्या तब्येतीवर त्याचा परिणाम होतो. याला पर्याय म्हणून संस्थेने मुरघास मशीन तयार करून घेतली. मुरघास मध्ये हिरव्या चाऱ्याचे गुणधर्म कायम टिकून राहतात. तयार केलेल्या मुरघास हवाबंद असल्यास एक वर्षापर्यंत टिकू शकतो. हिरव्या चाऱ्याची कमतरता असेल अशावेळी मुरघास घालणे सोयीचे होते. मुरघास मशीन मुळे 50 किलोच्या बॅगांमध्ये मुरघास तयार करता येतो.
देशी बियाणांचे जतन-
डॉक्टर हेडगेवार प्रकल्पाच्या माध्यमातून शेतकऱ्यांमध्ये या विषयाची जागृती करण्याचे मोठ्या प्रमाणावर प्रयत्न सुरु आहेत. याला आता यश येऊ लागले आहे. रासायनिक शेतीमुळे नापीकता वाढत चालले आहे. कॅन्सर सारखे भयानक रोग वाढले आहेत. म्हणून जैविक शेती, देशी वाण याकडे विशेष लक्ष देऊन, त्याचा प्रसार करण्याकरता आपला प्रकल्प शेतकऱ्यांच्या मदतीने प्रयत्न करीत आहे. देशी वाणांचे महत्त्व आता शेतकऱ्यांना पटू लागले आहे. पद्मश्री राहीबाईंसारखी शेतकरी महिला याकरता प्रयत्न करीतच आहे. चला तर मग आपणही असा प्रयत्न करूया……
भातशेती-
कोकणातील शेतीमधील प्रमुख पीक म्हणजे तांदूळ. जवळपास 99% लोक तांदूळ हे पीक घेऊन भात शेती करतात. खूप पाऊस असल्याकारणाने या भागात भातशेती केली जाते. जवळपास दसऱ्यानंतर पीक कापणीला येईल अशा प्रकारची तांदळाची बियाणे वापरून येथील शेतकरी भात करतो. तांदुळासोबतच मिळणारे गवत हे येथील शेतकऱ्यांच्या जनावरांना मिळते आणि जनावरांच्या पोटापाण्याचा प्रश्न या शेतीतून त्याला भागवता येतो. पारंपरिक प्रकारची बियाणे आजही शेतकरी लोप पावत असताना डॉक्टर हेडगेवार स्मृती सेवा प्रकल्पाच्या माध्यमातून अनेक प्रकारची पारंपरिक बियाणे जतन करण्यासाठी जनजागृती केली जात आहे. ही बियाणे पुन्हा शेतकऱ्याने आपल्या शेतात वापरावीत असा प्रकल्पाचा आग्रह राहिलेला आहे. तसेच भात शेतीमध्ये तंत्रज्ञानाचा मोठ्या प्रमाणावर वापर करून आधुनिक पद्धतीने भात शेती करण्यावर प्रकल्पाने भर दिलेला आहे. यासाठी विविध तंत्रज्ञान विषयक प्रशिक्षणे, कार्यशाळा प्रकल्पाच्या माध्यमातून आयोजित केल्या जातात. परिसरातील शेतकरी या तंत्रज्ञान प्रशिक्षण तसेच कार्यशाळांना उपस्थित राहून मार्गदर्शन घेत आहेत.
नैसर्गिक शेती/बागायती शेती-
डॉक्टर हेडगेवार प्रकल्प नेहमी नैसर्गिक शेतीला प्राधान्य देत आलेला आहे. रासायनिक खतांचा दुरुपयोग टाळून सेंद्रिय खतांच्या आधारावर यशस्वीरित्या शेती करून मोठ्या प्रमाणावर उत्पादन घेता येते हे प्रकल्पाने सिद्ध करून दाखवलेले आहे. आज परिसरामध्ये खतांवर वाढलेली उत्पादने आपल्या प्रत्यक्ष-अप्रत्यक्षरीत्या आपण खत असतो. त्याचे अनेक दुष्परिणाम आपल्याला आपल्या जीवनामध्ये भोगावे लागतात. म्हणून डॉक्टर हेडगेवार प्रकल्पाचा आग्रह असा आहे की, तरुणांनी नैसर्गिक शेती, बागायती शेती करावी, आपल्या प्रकल्पाच्या शेतीच्या जागेत आपण एक एकरात यशस्वी ऊस लागवड गेली अनेक वर्ष करत आहोत. आपल्या माणगाव गावांमध्ये ऊस रसवंतीगृहांना लागणारा ताजा ऊस आपण अगदी माफक दरात रसवंतीगृहांना पुरवत आहोत. त्यामुळे गावातील पैसा गावातच राहतो आणि बाहेरील पैसाही गावात येऊ लागला आहे. ऊस विक्री बरोबर नैसर्गिक गुळ तयार करून त्याची विक्री ही प्रकल्प करत आहे. याला खूपच चांगला प्रतिसाद मिळत आहे. प्रकल्पामध्ये अनेक प्रकारची बागायती शेती उदाहरणार्थ- नारळ लागवड, चिकू लागवड, पेरू लागवड, ऊस लागवड, फुल शेती, सुपारी लागवड याविषयीची प्रशिक्षण दिली जात आहेत. अशा प्रकारच्या शेतीतून कोकणातील तरुण शेतीकडे वळला पाहिजे. नैसर्गिक शेतीच्या आधारे तरुणांच्या सहकार्याने आपला देश कृषी संपन्न करायला हवा.असा हेतू बाळगून प्रकल्प अशा प्रकारचे विविध उपक्रम राबवत आहे.