ग्रामविकास

डॉक्टर बाबासाहेब लेले स्मारक समिती संचलित डॉक्टर हेडगेवार स्मृती सेवा प्रकल्प माणगाव गेली अनेक वर्षे माणगाव आणि परिसरातील लोकांना शेतीविषयक सर्व मार्गदर्शन, शंका-कुशंका या सर्वांचे मार्गदर्शन केंद्र करणारे केंद्र म्हणून नावारूपास येत आहे. कोकणामध्ये अनेक वर्षांपासून येथील तरुणाई मुंबई,पुणे,गोवा या ठिकाणी नोकरी धंद्यासाठी जाण्यास इच्छुक असते. परंतु घराकडे असलेली काही एकर जमीन ही पडीक असते. ती जमीन कसून शेती करण्याची इच्छा येथील तरुणाईला होत नाही, त्याचे कारण असे की, त्या जमिनीत काही उगवत नाही. असा समज येथील तरुणांमध्ये आहे. हाच समज दूर करण्यासाठी डॉक्टर हेडगेवार प्रकल्प गेली अनेक वर्षे शेतीमध्ये नवनवीन प्रयोग करून शेतकऱ्यांना हे दाखवून देत आहे की कोकणातील या शेतीमध्ये भात शेती, फुल शेती, गोशाळा,बागायती यांच्या माध्यमातून तसेच शेतीतून निघणाऱ्या विविध उत्पादनातून प्रक्रिया होणारे उद्योग आपण करू शकतो. याचे रोल मॉडेल येथे उभे केलेले आहे. सर्वप्रथम प्रकल्पामध्ये एखादा शेतीविषयक प्रयोग केला जातो आणि तो प्रयोग कसा केला? त्याच्यातील त्रुटी काय? त्याच्यात फायदा किती? तोटा किती? याचे सर्व मार्गदर्शन शेतकऱ्यांना केले जाते आणि त्या प्रकारे शेती करण्यासाठी उद्युक्त केले जाते. सध्या प्रकल्पाच्या माध्यमातून बेबी कॉर्न लागवड, फुलशेती, गटशेती, करार शेती, गोशाळा, गांडूळखत प्रकल्प, बागायती शेती याविषयीचे मार्गदर्शन केले जात आहे.

या संस्थेच्या केंद्रस्थानी येथील शेतकरी असून शेतीसोबत इतर आर्थिक स्त्रोत उपलब्ध करून देण्याचा संस्थेचा मानस आहे. परिसरातील शेतकऱ्यांनी दुग्धोत्पादन घेण्यासाठी सुरुवात केली असून त्यासाठी गाई, म्हशी यांची निवड व खरेदी, हिरव्या चाऱ्याची उपलब्धता,,मुरघास बनवण्याचे तंत्रज्ञान, दूध संकलन केंद्र इत्यादी विषयी मार्गदर्शन व पाठबळ संस्थेने दिले आहे. उत्तम दुधासाठी बेबी कॉर्नची लागवड करून त्यातून उत्पन्न व हिरवा चारा गाई-म्हशींसाठी देणे यातून अनेक शेतकऱ्यांना लाभ झाला. गटशेतीच्या माध्यमातून दरवर्षी शेतकरी बेबी कॉर्न ची लागवड करतात व आपल्या जनावरांसाठीचा चारा आपल्या शेतात तयार करतात. गोठोस व मळगाव येथे दूध संकलन केंद्र स्थापन करून शेतकरी स्वतः आर्थिक लाभ घेत आहेत. सेंद्रिय शेतीच्या माध्यमातून परिसरातील शेतकऱ्यांचे सक्षमीकरण हाच संस्थेचा हेतू आहे. शेतकरी गटांमध्ये गो-आधारित शेती, ग्रामीण बी बियाणे संकलन व वापर, सेंद्रिय पद्धतीची शेती करून उत्पादन खर्च कमी करून उत्पादकतेत वाढ करणे आणि गुणवत्ता पूर्ण उत्पादन घेणे, सोबतच शेतकऱ्यांना सक्षम बनवणे हा संस्थेचा मानस आहे.

डॉ. हेडगेवार स्मृती सेवा प्रकल्प गरीब,वंचित, पीडित, शोषित घटकांना इतर समाजाप्रमाणे मानाने आणि हक्काने जगता यावे, या कामी गेली कित्येक वर्ष काम करत आहे. शेती हा आपल्या देशाचा कणा मानला जातो. मात्र केवळ पारंपारिक शेती कारणे सध्याच्या बदलत्या ऋतुमानात परवडण्यासारखे नाही, मग शेतीला जोड व्यवसाय देऊन शेतकऱ्यांमध्ये शेतीमध्ये अर्थार्जन आहे, याचे बीजारोपण करण्याचे कार्य संस्था गेली अनेक वर्ष करत आहे. काही गावांमध्ये शेतकरी गट, दूध संस्था स्थापन करून मूर्तीमंत उदाहरणे संस्थेने उभी केली आहेत. संस्था सुरुवात करून देते बाकी सर्व कामे शेतकऱ्यांनीच करावी असा आग्रह धरते. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सावंतवाडी तालुक्यातील मळगाव गावांमध्ये दूध संकलनाचे कार्य काही शेतकऱ्यानी एकत्र येऊन प्रकल्पाच्या मार्गदर्शनाखाली सुरू केले. या शेतकऱ्यांनी कल्पवृक्ष शेतकरी गट स्थापन करून विविध उपक्रम राबवले आहेत. यामध्ये पारंपारिक भात बियाणे लागवड, पाणवठे बांधून घेणे, गांडूळ खत प्रकल्प, दुध शीतकरण प्रकल्प इत्यादी कार्यक्रम मालगाव मध्ये संस्थेच्या मार्गदर्शनखाली आजही चालू आहेत. सोबतच कुडाळ तालुक्यातील गोठोस येथील काही तरुणांनी एकत्र येऊन प्रकल्पाच्या मार्गदर्शनाखाली दूध संकलन केंद्र स्थापन केलेले आहे. आजूबाजूच्या लोकांनी दुधाळ जनावरे पाळून आपला स्वतःचा चरितार्थ चालवता येईल अशी व्यवस्था केली आहे. प्रकल्पाच्या या दूरदृष्टी ठेवून केलेल्या उपक्रमाला शेतकऱ्यांनी उचलून धरले आहे.