केंद्रीय उद्योगमंत्र्यांकडून क्लस्टर उभारणीची पाहणी

डॉ. हेडगेवार स्मृती सेवा प्रकल्प हा जिल्ह्यातील तरुणांना काम देणारा प्रकल्प आहे……केंद्रीय मंत्री नारायण राणे
डॉ.बाबासाहेब लेले स्मारक समिती संचलित डॉ.हेडगेवार स्मृती सेवा प्रकल्प यांच्यावतीने होत असलेल्या कोकण सिंधू मल्टीफ्रुट क्लस्टर फाउंडेशनच्या उभारणीच्या कामाचे निरीक्षण करण्यासाठी केंद्रीय लघु व सूक्ष्म उद्योग मंत्री सन्माननीय नारायणरावजी राणे साहेब यांचे प्रकल्पामध्ये आगमन झाले. यावेळी त्यांनी सुरू असलेल्या क्लस्टरच्या बांधकामाचे निरीक्षण केले. डॉक्टर हेडगेवार स्मृती सेवा प्रकल्पाच्या वतीने मंत्रीमहोदयांचा शाल, श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. सोबतच प्रकल्पाच्या सभागृहात झालेल्या छोटेखानी सभेला मार्गदर्शन करताना ते म्हणाले की हा क्लस्टर म्हणजे जिल्ह्यातील उद्योजकां सोबतच माणगाव खोर्‍यातील उद्योजकांसाठी नवसंजीवनी ठरणार आहे. तरुणांनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन त्यांनी केले. यावेळी कोकण सिंधू मल्टीफ्रुट क्लस्टर फाउंडेशन ची निर्मिती कोणत्या उद्देशाने झाली आहे, भविष्यात कोकणात मिळणाऱ्या विविध फळां संदर्भात बाय प्रॉडक्ट निर्माण करण्यासाठी हा क्लस्टर मैलाचा दगड कसा बनणार आहे? याची ओळख प्रकल्पाचे अध्यक्ष श्री सुनील उकिडवे यांनी करून दिली. यावेळी केंद्रीय मंत्री राणे यांनी प्रकल्प समाज उद्धारासाठी करत असलेल्या कामाचे तोंड भरून कौतुक केले. यावेळी व्यासपीठावर सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती बँकेचे अध्यक्ष श्री मनीष दळवी, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे कार्यवाह श्री लवू महाडेश्वर, क्लस्टरचे अध्यक्ष श्री वारंग, प्रकल्पाचे अध्यक्ष श्री सुनील उकिडवे, प्रकल्पाचे तसेच क्लस्टरचे सर्व विश्वस्त, कर्मचारी उपस्थित होते.

Tags: